डॉ. बाबासाहेब आंबेडकर

शिक्षणासाठी, समाजाच्या कल्याणासाठी आयुष्यभर संघर्ष करणारे. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, असा गुरुमंत्र देणारे तसेच असामान्य कर्तृत्व गाजवणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १४ एप्रिल १८९१ रोजी जन्म झाला.


मध्य प्रदेशातील महू येथे बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला. बाबासाहेबांच्या वडिलांचे नाव रामजी आणि आईचे नाव भीमाबाई असे होते. मध्य प्रदेशानंतर काही काळ दापोली, सातारा असे वास्तव्य करीत आंबेडकरांचे कुटुंब मुंबईत राहण्यास आले. बाबासाहेबांनी सुरुवातीचे शिक्षण मुंबईतील सरकारी शाळेत घेतले. वयाच्या १४-१५ वर्षी बाबासाहेब आंबेडकर यांचा विवाह दापोली येथील भिकू वलंगकर यांच्या मुलीशी म्हणजेच रमाबाई यांच्याशी झाला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर 1907 मध्ये मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर त्यांनी एल्फिन्स्टन महाविद्यालयातून अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयात बी.ए. पदवी घेतली. यानंतर त्यांनी कोलंबिया युनिव्हर्सिटी, न्यूयॉर्कमध्ये मास्टर्स ऑफ आर्ट्ससाठी प्रवेश घेतला आणि 1927 मध्ये अर्थशास्त्रात पीएचडी केली. 1916 मध्ये त्यांनी ग्रेज इन येथे बार कोर्ससाठी प्रवेश घेतला. यासोबतच त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून अर्थशास्त्रात आणखी एक डॉक्टरेट पदवी पूर्ण केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे 64 विषयात मास्टर्स होते आणि त्यांना 11 भाषां लिहिता वाचता आणि बोलता येत होत्या.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पहिली सार्वजनिक जयंती सदाशिव रणपिसे यांनी १४ एप्रिल १९२८ रोजी पुण्यात साजरी केली. त्यांनी बाबासाहेबांच्या जयंतीची प्रथा सुरू केली आणि भीम जयंतीचे औचित्य साधत बाबासाहेबांची प्रतिमा हत्तीच्या अंबारीत ठेवून रथातून, उंटावरून अनेक मिरवणुका काढल्या होत्या. तेव्हापासून दरवर्षी 14 एप्रिलला आंबेडकर जयंती साजरी करण्याची परंपरा सुरू झाली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजेच भीमराव आंबेडकर यांचे जीवन खूप संघर्षमय आणि प्रेरणादायी आहे. भारताच्या स्वातंत्र्यानंतर देशाच्या संविधानाच्या निर्मितीमध्ये आंबेडकरांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ते केवळ मागासवर्गीयांच्या हक्कांसाठीच लढले नाहीत तर पक्षपात आणि जातिव्यवस्थेविरुद्ध आवाज उठवणारे समाजसुधारकही होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार करणाऱ्या समितीचे नेतृत्व केले होते. जवाहरलाल नेहरूंच्या पहिल्या मंत्रिमंडळात त्यांनी कायदा आणि न्यायमंत्री म्हणून काम केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर राज्यसभेत दोन वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. डॉ. भीमराव आंबेडकर यांचे निधन 6 डिसेंबर 1956 रोजी झाले. 1990 मध्ये बाबासाहेबांना भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

महात्मा जोतिराव गोविंदराव फुले

महात्मा जोतिराव गोविंदराव फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी झाला. हे एक भारतीय समाजसुधारक, समाजप्रबोधक, विचारवंत, समाजसेवक, लेखक, तत्त्वज्ञ आणि क्रांतिकारी कार्यकर्ते होते. त्यांना महात्मा फुले आणि “जोतिबा फुले” म्हणूनही ओळखले जाते. त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या.

गरीब आणि दुर्बलांना न्याय मिळवून देण्यासाठी ज्योतिबांनी 1873 मध्ये ‘सत्यशोधक समाज’ ची स्थापना केली. त्यांची समाजसेवा पाहून 1888 मध्ये मुंबईत एका विशाल सभेत त्यांना ‘महात्मा’ ही पदवी देण्यात आली. त्यांनी स्त्रियांच्या आणि मागासलेल्या आणि अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी अनेक कामे केली. समाजातील सर्व घटकांना शिक्षण देण्याचे ते खंबीर पुरस्कर्ते होते. ते भारतीय समाजात जात-आधारित विभाजन आणि भेदभावाच्या विरोधात होते.

स्त्रियांना शिक्षणाचा हक्क मिळवून देणे, बालविवाहाला विरोध करणे, विधवा विवाहाला पाठिंबा देणे हे त्यांचे मूळ उद्दिष्ट होते. फुले यांना समाजाला कुप्रथा, अंधश्रद्धेच्या पाशातून मुक्त करायचे होते. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य महिलांना शिक्षण देण्यात, महिलांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देण्यात घालवले.

ज्योतिबांनी ब्राह्मण-पुरोहिताविना विवाह विधी सुरू केला आणि त्याला मुंबई उच्च न्यायालयानेही मान्यता दिली. ते बालविवाहाच्या विरोधात होते आणि विधवा पुनर्विवाहाचे समर्थक होते. आपल्या हयातीत त्यांनी गुलामगिरी, तृतीय रत्न, छत्रपती शिवाजी, राजा भोसला का पखडा, किसान का कोडा, अस्पृश्य की कैफियत अशी अनेक पुस्तकेही लिहिली. महात्मा ज्योतिबा आणि त्यांच्या संघटनेच्या संघर्षामुळे सरकारने ‘कृषी कायदा’ मंजूर केला. धर्म, समाज आणि परंपरा यांचे सत्य समोर आणण्यासाठी त्यांनी अनेक पुस्तकेही लिहिली.

कार्यक्षेत्र
त्यांनी विधवा आणि महिलांच्या कल्याणासाठी खूप काम केले, त्यासोबतच त्यांनी शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यासाठी आणि त्यांच्या कल्याणासाठीही खूप प्रयत्न केले. ज्योतिबांना संतांची चरित्रे वाचण्याची खूप आवड होती. जेव्हा देवासमोर सर्व स्त्री-पुरुष समान असतात, तेव्हा उच्च-नीच असा भेद का असावा, हे त्यांना कळून चुकले होते. स्त्रियांची स्थिती सुधारण्यासाठी आणि त्यांच्या शिक्षणासाठी फुले यांनी 1848 मध्ये शाळा उघडली. या कामासाठी देशातील पहिली शाळा होती. मुलींना शिकवण्यासाठी त्यांना शिक्षक मिळाला नाही, म्हणून त्यांनी स्वतः काही दिवस हे काम करून पत्नी सावित्री फुले यांना पात्र बनवले. काही लोकांनी सुरुवातीपासूनच त्यांच्या कामात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला, पण फुले पुढे सरकत असताना त्यांनी वडिलांवर दबाव आणून पती-पत्नीला घराबाहेर काढले, यामुळे त्यांचे काम काही काळ थांबले, पण लवकरच त्यांनी मुलींसाठी एकामागून एक तीन शाळा उघडल्या.

1883 मध्ये, स्त्रियांना शिक्षण देण्याच्या महान कार्यासाठी, त्यांना तत्कालीन ब्रिटिश भारतीय सरकारने “स्त्री शिक्षणाचे जनक” म्हणून गौरवले. 28 नोव्हेंबर 1890 रोजी वयाच्या 63 व्या वर्षी पुणे येथे त्यांचे निधन झाले.

चित्रकला स्पर्धा २०२४

महाराष्ट्र मंडळ कुवेत आयोजित ७५ व्या अमृत मोहत्सवी ऑनलाइन चित्रकला स्पर्धेला मिळालेल्या उदंड प्रतिसादाबद्दल सर्वांचे स्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.
सर्व सहभागींनी वेळ आणि मेहनत घेऊन तयार केलेली अप्रतिम कलाकृती खालील प्रमाणे.

मराठी भाषा गौरव दिन

मराठी भाषा गौरव दिन हा दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो. कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्रच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले गेले आहेत. आपल्या मातृभाषेला गौरव म्हणून व कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करण्याचा शासन निर्णय दिनांक २१ जानेवारी इ.स. २०१३ रोजी घेण्यात आला.


मराठी भाषागौरव दिवस आणि मराठी राजभाषा दिवस हे दोन्ही दिवस भिन्न आहेत.

भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद 347 नुसार लक्षणीय प्रमाणात लोकांकडून बोलल्या जाणाऱ्या कोणत्याही भाषेला राष्ट्रपतींना राजभाषा म्हणून मान्यता देण्याची तरतूद व अधिकार आहे. ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त मराठी कवी कुसुमाग्रज यांचे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान महत्त्वपूर्ण असल्याने त्यांना अभिवादन म्हणून २१ जानेवारी २०१३ रोजी महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार कुसुमाग्रजांचा जन्मदिवस २७ फेब्रुवारी हा “मराठी भाषा गौरव दिन” म्हणून घोषित करण्यात आले आहे.

1 मे रोजी महाराष्ट्र दिनाबरोबरच मराठी राजभाषा दिवस साजरा केला जातो.1 मे 1960 ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली.परंतु राज्य कारभाराची अधिकृत भाषा म्हणून मराठी भाषेला मान्यता नव्हती. हे शल्य वसंंतराव नाईक यांना होते. त्यामुळे तत्कालिन मुख्यमंत्री वसंतराव नाईक सरकारने ‘मराठी राजभाषा अधिनियम 1964’ सर्वप्रथम आणून 11 जानेवारी 1965 रोजी प्रसिद्ध केला. या अधिनियमानुसार, महाराष्ट्राची अधिकृत राजभाषा ही मराठी असेल असे वसंंतराव नाईक सरकारने १ मे रोजी अधिकृतपणे जाहीर केले.1966 पासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली. वसंतराव नाईक सरकारने पुढे मराठी भाषा संवर्धनासाठी राज्यात पहिल्यांदाच भाषा संचालनालयाची निर्मिती करून प्रादेशिक स्तरावर चार केंद्राची स्थापना केली आणि राज्यकारभार मराठीतून चालणार असे अधिकृत जाहीर केले.
मराठी भाषा ज्ञानभाषा करण्यासाठी परिश्रम घेणारे प्रतिभावंत साहित्यिक वि.वा.शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्त २७ फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषागौरव दिवस म्हणून सन २०१३ पासून साजरा केला जातो.

संत गाडगेबाबा

संत गाडगेबाबा – कार्य

१९०८ : मध्ये पुर्णा नदीवर घाटाचे निर्माण केले.

१९२५ : मुर्तीजापूर येथे गोरक्षण , धर्मशाळा व विद्यालयाचे निर्माण केले.

१९१७ : पंढरपूर येथे चोखामेळा धर्मशाळेचे निर्माण गाडगेमहाराजांनी केले. मी कुणाचा गुरू नाही व माझा कुणी शिष्य नाही“ असे म्हणून त्यांनी कुठल्याही संप्रदायाला समर्थन देण्याचे नाकारले.

फेब्रुवारी ८,इ.स. १९५२ रोजी ‘श्री गाडगेबाबा मिशन‘ स्थापन करून महाराष्ट्रभर शिक्षणसंथा व धर्मशाळा स्थापन केल्या. गाडगे महाराज जातीने परिट व गोधडे महाराज म्हणून ओळखले जात होते.

१९३२ : ऋणमोचन येथील सदावर्त संत गाडगेबाबांनी सुरू केले. गाडगे महाराजांनी कीर्तनांद्वारे लोकजागृतीचा मार्ग अवलंबला. “गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला“ हे गाडगे महाराजांचे आवडते भजन होते. आचार्य अत्रे गाडगेबाबां बद्दल म्हणतात ‘सिंहाला पाहावे वनात, हत्तीला पाहावे रानात, तर गाडगेबाबांना पाहावे कीर्तनात‘

१९३१ : वरवंडे येथे गाडगेबाबांच्या प्रबोधनातून पशुहत्या बंद झाली.

१९५४ : जे.जे. हॉस्पिटल धर्मशाळा ( मुंबई) बांधली. गाडगे बाबांनी डॉ. पंजाबराव देशमुख, व कर्मवीर भाऊराव पाटील यांना त्यांच्या कार्यात मदत केली होती. डॉ आंबेडकर सुद्धा त्यांना गुरू स्थानी मानत असत.

गाडगे महाराज, ज्यांना संत गाडगे महाराज किंवा गाडगे बाबा म्हटले जाते. त्याना महाराष्ट्रातील एक महान कीर्तनकार, संत आणि समाजसुधारक म्हणून ओळखले जाते. विसाव्या शतकातील समाजसुधार आंदोलनांमध्ये ज्या महापुरुषांचा सहभाग आहे, त्यापैकी एक महत्त्वाचे नाव गाडगे बाबा यांचे आहे. अशा या महान पुरुषाने राबविलेल्या मोहिमेची दखल आपल्या राज्य-शासनाला घ्यावी लागली. त्यांच्या नावाने ‘संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान’ राज्यस्तरीय मोहीम कार्यरत आहे. त्यांच्या सन्मानार्थ अमरावती विद्यापीठा ला संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ असे नाव देण्यात आले.

गाडगे महाराज चरित्र

त्यांचे खरे नाव देविदास डेबूजी जानोरकर. त्यांचा जन्म महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील शेडगाव गावात धोबी कुटुंबात झाला. ते मूर्तिजापूर तालुक्यातील दापुरी येथे आपल्या आजोबांच्या घरी लहानाचा मोठा झाले. लहानपणापासूनच त्यांना शेती आणि पशुपालनाची आवड होती. १८९२ मध्ये त्यांनी लग्न केले आणि त्यांना तीन मुले झाली. १ फेब्रुवारी १९०५ रोजी संत म्हणून आपले जीवन जगण्यासाठी आपले कुटुंब सोडण्यापूर्वी त्यांनी आपल्या गावात स्वयंसेवक म्हणून काम केले. गाडगे महाराजांनी बारा वर्षे अज्ञातवासात घालवली. या काळात गाडगे महाराजांनी कडन्ना प्राशन करून, चिंध्या पांघरून, मस्तकी गाडगे घालून शारीरिक श्रम केले. लोक त्यांना आदराने गाडगे महाराज म्हणू लागले.

लोकांचे जीवन उजळण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रात ठिकठिकाणी फिरले, गावातील रस्ते हाताने साफ केले. विवेकाच्या बळावर गावोगावी जाऊन त्यांनी लोकांची मने स्वच्छ केली. गाडगे महाराज यांनी गरीब आणि दीनदुबळ्यांमधील अज्ञान, अंधश्रद्धा आणि अस्वच्छता नष्ट करण्यासाठी तळमळीने काम केले. गरीब, दुर्बल, अनाथ, अपंग यांची सेवा करून त्यांनी लोकांना अज्ञान, दुर्गुण, दोष यांची जाणीव करून दिली. त्यांची प्रवचनेही साधी आणि सोपी असत. चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज घेऊ नका, व्यसने करू नका, देव-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातिभेद, अस्पृश्यता पाळू नका, असे ते नेहमी म्हणायचे. देव दगडात नसून माणसांमध्ये आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न केला. गाडगे महाराज संत तुकाराम महाराजांना आपले गुरू मानत. आपले विचार साध्या लोकांना कळावेत म्हणून त्यांनी ग्रामीण भाषेचा, प्रामुख्याने वऱ्हाडी बोलीचा वापर केला.

जेव्हा ते गावात पोहोचायचे तेव्हा ते गावातील नाले आणि रस्ते स्वच्छ करायचे आणि गावकऱ्यांनी पैसे दिले तर ते समाजासाठी काहीतरी चांगले करण्यासाठी वापरायचे. गाडगे महाराजांनी मिळालेल्या पैशातून अनेक शैक्षणिक संस्था, धर्मशाळा, रुग्णालये, प्राणी निवारे सुरू केले आहेत. त्यांनी कीर्तनाच्या स्वरूपात वर्गही चालवले, बहुतेक कबीरांच्या दोहेतून समाजाला नैतिकतेचे धडे दिले. त्यांनी कठोर परिश्रम, साधे जीवन आणि गरिबांची निस्वार्थ सेवा करण्याचा उपदेश केला. त्यांनी धार्मिक स्थळे आणि अनाथ आणि अपंगांसाठी धार्मिक शाळाही स्थापन केल्या. गाडगे महाराजांनी पंढरपूर, देहू, आळंदी, नाशिक, मुंबई येथे अनेक धर्मशाळा बांधल्या. अनेक लोककल्याणाची कामे केली. त्यांनी आपले जीवन एकनिष्ठ आणि धार्मिक वृत्तीने व्यतीत केले. गाडगे महाराज हे समतेचे पुरस्कर्ते होते. अखेर त्यांच्या पार्थिवावर अमरावती येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराज

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत, लोककल्याणकारी महाराजाधिराज, रयतेचे राजे, श्रीमंत योगी छत्रपती श्री शिवाजी महाराज यांना ३९४ व्या जयंती निमित्त त्रिवार मानाचा मुजरा.

प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधी श्वर, महाराजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय !

शिवरायांचे आठवावे रूप ।
शिवरायांचा आठवावा प्रताप
शिवरायांचा आठवावा साक्षेप
भूमंडळी ।।१।।

शिवरायांचे कैसें बोलणें।
शिवरायांचे कैसें चालणें।
शिवरायांची सलगी देणे।
कैसी असे ।।२।।

या भूमंडळाचे ठाई धर्म रक्षि ऐसा नाही l महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे ||

छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरी किल्यावर झाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. रयतेचा राजा कसा असावा याचा पायंडा शिवाजी महाराजांनी रचला. 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची तारखेनुसार जयंती आहे. शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांवर व रयतेवर जीवापाड प्रेम केले. जाती-पातीच्या भिंती तोडून सर्वांना सन्मान दिला. त्यामुळेच त्यांना रयतेचा राजा म्हटले जाते. प्रत्येक मोहिमेनंतर शिवाजी महाराज तलवारी मिरवणाऱ्या धारकऱ्यांना ‘मानकरी’, भाला फेकणाऱ्या निष्णात सैनिकाचा ‘भालेराव’ अशी उपाधी देऊन गौरव करायचे. जीवावर उदार होवून चढाई करणाऱ्या सैनिकांना सोन्याचे कडे द्यायचे.

शिवाजी महाराजांना मोठी दूरदृष्टी होती. स्वराज्यासाठी काय काय केले जाऊ शकते, याचा विचार त्यांच्याकडे होता. स्वराज्य स्थापनेनंतर ते विस्तारले कसे जाईल, याचा ते सदैव विचार करत असत. त्यांनी बांधलेले गडकिल्ले हे याचे उत्तम उदाहरण आहे. हे गडकिल्ले इतके अभेद्य असत की शत्रूला त्यावर चाल करून जाताना हजारदा विचार करावा लागे. किल्ल्यांभोवतीची तटबंदी मजबूत असे आणि त्यासाठी किल्ल्यावर केलेल्या खोदकामांतून मिळालेलेच दगड वापरले जाते. त्यामुळे इतक्या उंचावर इतके अभेद्य किल्ले बांधता आले. शत्रूचा धोका जसा जमिनीवर आहे तसाच तो पाण्याच्या बाजूनेही असू शकतो, या दूरदृष्टीतून त्यांनी जलदुर्गांची निर्मिती केली. हा संपन्न वारसा आजही महाराष्ट्र अभिमानाने मिरवत आहे.

गनिमी कावा हे शिवाजी महाराजांचे प्रमुख हत्यार होते. अनेक मोहिमा, लढाया शिवाजी महाराजांनी गनिमी कावा करून जिंकल्या होत्या. शत्रूचे सैन्य कितीही प्रचंड असले तरी काही मावळ्यांच्या मदतीने शिवाजी महाराजांनी शत्रूचा पाडाव केला. स्वराज्य स्थापन करताना शिवाजी महाराजांनी शेकडो किल्ले बांधले आणि जिंकले. हिंदवी स्वराज्यात शिवाजी महाराजांकडे 400 गड-किल्ले होते, असे सांगितले जाते. यातील अनेक गड किल्ले आज देखील जशेच्या तशे आहेत.

 

प्रजासत्ताक दिन

भारतीय प्रजासत्ताक दिन

भारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा स्वातंत्र्य लढा आणि त्यातील स्वतंत्र सेनानींचा मोठा सहभाग आहे. तेव्हा स्वतंत्र भारताला स्वतःचे संविधान नव्हते. भारताचे कायदे हे भारतीय राज्यशासनाच्या १९३५ सालच्या कायद्यावर (कलमावर) आधारित होते.


२९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र भारताचे संविधान तयार करण्यासाठी मसूदा समिती स्थापना केली गेली. या समितीने संविधानाचा मसुदा तयार करून तो सभेपुढे ४ नोव्हेंबर १९४७ रोजी सादर केला. या सभेने सार्वजनिक चर्चेसाठी सभागृहात हा प्रस्ताव १६६ दिवसांसाठी खुला केला आणि २ वर्ष,११ महिने आणि १८ दिवसाच्या कालावधी नंतर समितीने हा मसुदा अंतिम केला. बरेचसे विचार विमर्श आणि सुधारणा केल्यानंतर समितीच्या ३०८ सद्स्यांनी दोन हस्तलिखित प्रती (हिंदी आणि इंग्रजी) २४ जानेवारी १९५० रोजी स्वाक्षरांकित केल्या. दोन दिवसानंतर २६ जानेवारी १९५० रोजी हे भारताचे संविधान संपूर्ण राष्ट्रासाठी लागू करण्यात आले.

 
भारताच्या संविधानाच्या निमित्ताने भारताचा प्रजासत्ताक दिन हा साजरा करण्यात येतो. या दिवशी देशभरात भारताच्या राष्ट्रध्वजाचे आरोहण होऊन त्याला वंदना दिली जाते. भारताचे राष्ट्रगीत म्हटले जाते आणि आदर व्यक्त केला जातो. हा दिवस आपल्या देशातील सुवर्ण दिन आहे. या दिवसाची प्राप्ती हजारो देशभक्तांच्या बलिदानातून झाली आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

लोकशाही आणि देशभक्तीची भावना अशीच फुलत राहो!

राजमाता जिजाऊ

स्वराज्याचा जिने घडविला विधाता,
धन्य ती स्वराज्य जननी जिजामाता ॥

राजमाता जिजाबाई यांचा जन्म १२ जानेवारी १५९८ रोजी महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा जवळील देऊळगाव येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव लखुजीराजे जाधव आणि आईचे नाव म्हाळसा बाई होते. त्यांचे वडील लखुजीराजे जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते. तसेच सिंदखेडराजा येथील मातब्बर सरदार होते. जिजाबाईंना लहानपणापासुनच विविध विद्याबरोबर राजकारणाचे व युद्धनीतीचे बाळकडू मिळाले होते. त्यांच्या लहान वयातच त्यांचा विवाह डिसेंबर १६०५ मध्ये वेरूळ गावचे पाटील मालोजीराजे भोसले यांचे चिरंजीव शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला.

१९ फेब्रुवारी १६३० रोजी जिजाबाई यांच्या पोटी तेजस्वी, पराक्रमी अशा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. जिजाबाईंनी लहानपणापासूनच शिवरायांवर रामायण व महाभारतातील राम, कृष्ण, अर्जुन, भीम या वीरांच्या गोष्टी सांगून संस्कार केले. नेहमी सत्याचा विजय होतो तसेच अन्याय करणे व अन्यास सहन करणे दोन्हीही कसे चुकीचे आहे हे पटवून देत. शिवरायांना उत्तम शिक्षण देण्याच्या बाबतीत त्या सदैव जागरूक होत्या. त्यांनी शिवरायांवर शील, सत्यप्रियता, वाक्चातुर्य, दक्षता, धैर्य, निर्भयता, शस्रप्रयोग, विजयाकांक्षा, स्वराज्यस्वप्न इत्यादींचे चे संस्कार केले.

त्यांनी स्वराज्य स्थापना करण्याच्या कार्यात शिवरायांना सातत्याने मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिवरायांनी रायरेश्वराच्या मंदिरात हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली. हिंदवी स्वराज्याच्या कार्या त शिवरायांना अनेक धाडसी मोहिमा कराव्या लागल्या. जीव धोक्यात घालावा लागला. परंतु त्यांनी आपल्या काळजावर दगड ठेऊन स्वराज्यासाठी शिवरायांना धोका पत्कारण्यापासून रोखले नाही. त्यांच्या त्यागाच्या जीवावरच हिंदवी स्वराज्य निर्माण होऊ शकलं. १७ जून १६७४ रोजी किल्ले राजगडजवळील पाचाड गावात त्यांचे निधन झाले.

हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चातुर्य, चारित्र्य, पराक्रम व संघटन अशा सत्वगुणांचे बाळकडू देणा-या राजमाता जिजाऊ यांना मानाचा मुजरा.