हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत, लोककल्याणकारी महाराजाधिराज, रयतेचे राजे, श्रीमंत योगी छत्रपती श्री शिवाजी महाराज यांना ३९४ व्या जयंती निमित्त त्रिवार मानाचा मुजरा.
प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधी श्वर, महाराजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय !
शिवरायांचे आठवावे रूप ।
शिवरायांचा आठवावा प्रताप
शिवरायांचा आठवावा साक्षेप
भूमंडळी ।।१।।
शिवरायांचे कैसें बोलणें।
शिवरायांचे कैसें चालणें।
शिवरायांची सलगी देणे।
कैसी असे ।।२।।
या भूमंडळाचे ठाई धर्म रक्षि ऐसा नाही l महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे ||
छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरी किल्यावर झाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. रयतेचा राजा कसा असावा याचा पायंडा शिवाजी महाराजांनी रचला. 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची तारखेनुसार जयंती आहे. शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांवर व रयतेवर जीवापाड प्रेम केले. जाती-पातीच्या भिंती तोडून सर्वांना सन्मान दिला. त्यामुळेच त्यांना रयतेचा राजा म्हटले जाते. प्रत्येक मोहिमेनंतर शिवाजी महाराज तलवारी मिरवणाऱ्या धारकऱ्यांना ‘मानकरी’, भाला फेकणाऱ्या निष्णात सैनिकाचा ‘भालेराव’ अशी उपाधी देऊन गौरव करायचे. जीवावर उदार होवून चढाई करणाऱ्या सैनिकांना सोन्याचे कडे द्यायचे.
शिवाजी महाराजांना मोठी दूरदृष्टी होती. स्वराज्यासाठी काय काय केले जाऊ शकते, याचा विचार त्यांच्याकडे होता. स्वराज्य स्थापनेनंतर ते विस्तारले कसे जाईल, याचा ते सदैव विचार करत असत. त्यांनी बांधलेले गडकिल्ले हे याचे उत्तम उदाहरण आहे. हे गडकिल्ले इतके अभेद्य असत की शत्रूला त्यावर चाल करून जाताना हजारदा विचार करावा लागे. किल्ल्यांभोवतीची तटबंदी मजबूत असे आणि त्यासाठी किल्ल्यावर केलेल्या खोदकामांतून मिळालेलेच दगड वापरले जाते. त्यामुळे इतक्या उंचावर इतके अभेद्य किल्ले बांधता आले. शत्रूचा धोका जसा जमिनीवर आहे तसाच तो पाण्याच्या बाजूनेही असू शकतो, या दूरदृष्टीतून त्यांनी जलदुर्गांची निर्मिती केली. हा संपन्न वारसा आजही महाराष्ट्र अभिमानाने मिरवत आहे.
गनिमी कावा हे शिवाजी महाराजांचे प्रमुख हत्यार होते. अनेक मोहिमा, लढाया शिवाजी महाराजांनी गनिमी कावा करून जिंकल्या होत्या. शत्रूचे सैन्य कितीही प्रचंड असले तरी काही मावळ्यांच्या मदतीने शिवाजी महाराजांनी शत्रूचा पाडाव केला. स्वराज्य स्थापन करताना शिवाजी महाराजांनी शेकडो किल्ले बांधले आणि जिंकले. हिंदवी स्वराज्यात शिवाजी महाराजांकडे 400 गड-किल्ले होते, असे सांगितले जाते. यातील अनेक गड किल्ले आज देखील जशेच्या तशे आहेत.