प्रजासत्ताक दिन

भारतीय प्रजासत्ताक दिन

भारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा स्वातंत्र्य लढा आणि त्यातील स्वतंत्र सेनानींचा मोठा सहभाग आहे. तेव्हा स्वतंत्र भारताला स्वतःचे संविधान नव्हते. भारताचे कायदे हे भारतीय राज्यशासनाच्या १९३५ सालच्या कायद्यावर (कलमावर) आधारित होते.


२९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र भारताचे संविधान तयार करण्यासाठी मसूदा समिती स्थापना केली गेली. या समितीने संविधानाचा मसुदा तयार करून तो सभेपुढे ४ नोव्हेंबर १९४७ रोजी सादर केला. या सभेने सार्वजनिक चर्चेसाठी सभागृहात हा प्रस्ताव १६६ दिवसांसाठी खुला केला आणि २ वर्ष,११ महिने आणि १८ दिवसाच्या कालावधी नंतर समितीने हा मसुदा अंतिम केला. बरेचसे विचार विमर्श आणि सुधारणा केल्यानंतर समितीच्या ३०८ सद्स्यांनी दोन हस्तलिखित प्रती (हिंदी आणि इंग्रजी) २४ जानेवारी १९५० रोजी स्वाक्षरांकित केल्या. दोन दिवसानंतर २६ जानेवारी १९५० रोजी हे भारताचे संविधान संपूर्ण राष्ट्रासाठी लागू करण्यात आले.

 
भारताच्या संविधानाच्या निमित्ताने भारताचा प्रजासत्ताक दिन हा साजरा करण्यात येतो. या दिवशी देशभरात भारताच्या राष्ट्रध्वजाचे आरोहण होऊन त्याला वंदना दिली जाते. भारताचे राष्ट्रगीत म्हटले जाते आणि आदर व्यक्त केला जातो. हा दिवस आपल्या देशातील सुवर्ण दिन आहे. या दिवसाची प्राप्ती हजारो देशभक्तांच्या बलिदानातून झाली आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

लोकशाही आणि देशभक्तीची भावना अशीच फुलत राहो!

राजमाता जिजाऊ

स्वराज्याचा जिने घडविला विधाता,
धन्य ती स्वराज्य जननी जिजामाता ॥

राजमाता जिजाबाई यांचा जन्म १२ जानेवारी १५९८ रोजी महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा जवळील देऊळगाव येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव लखुजीराजे जाधव आणि आईचे नाव म्हाळसा बाई होते. त्यांचे वडील लखुजीराजे जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते. तसेच सिंदखेडराजा येथील मातब्बर सरदार होते. जिजाबाईंना लहानपणापासुनच विविध विद्याबरोबर राजकारणाचे व युद्धनीतीचे बाळकडू मिळाले होते. त्यांच्या लहान वयातच त्यांचा विवाह डिसेंबर १६०५ मध्ये वेरूळ गावचे पाटील मालोजीराजे भोसले यांचे चिरंजीव शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला.

१९ फेब्रुवारी १६३० रोजी जिजाबाई यांच्या पोटी तेजस्वी, पराक्रमी अशा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. जिजाबाईंनी लहानपणापासूनच शिवरायांवर रामायण व महाभारतातील राम, कृष्ण, अर्जुन, भीम या वीरांच्या गोष्टी सांगून संस्कार केले. नेहमी सत्याचा विजय होतो तसेच अन्याय करणे व अन्यास सहन करणे दोन्हीही कसे चुकीचे आहे हे पटवून देत. शिवरायांना उत्तम शिक्षण देण्याच्या बाबतीत त्या सदैव जागरूक होत्या. त्यांनी शिवरायांवर शील, सत्यप्रियता, वाक्चातुर्य, दक्षता, धैर्य, निर्भयता, शस्रप्रयोग, विजयाकांक्षा, स्वराज्यस्वप्न इत्यादींचे चे संस्कार केले.

त्यांनी स्वराज्य स्थापना करण्याच्या कार्यात शिवरायांना सातत्याने मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिवरायांनी रायरेश्वराच्या मंदिरात हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली. हिंदवी स्वराज्याच्या कार्या त शिवरायांना अनेक धाडसी मोहिमा कराव्या लागल्या. जीव धोक्यात घालावा लागला. परंतु त्यांनी आपल्या काळजावर दगड ठेऊन स्वराज्यासाठी शिवरायांना धोका पत्कारण्यापासून रोखले नाही. त्यांच्या त्यागाच्या जीवावरच हिंदवी स्वराज्य निर्माण होऊ शकलं. १७ जून १६७४ रोजी किल्ले राजगडजवळील पाचाड गावात त्यांचे निधन झाले.

हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चातुर्य, चारित्र्य, पराक्रम व संघटन अशा सत्वगुणांचे बाळकडू देणा-या राजमाता जिजाऊ यांना मानाचा मुजरा.