सावरकर, विनायक दामोदर : (२८ मे १८८३ – २६ फेब्रुवारी १९६६). भारतीय स्वातंत्र्याच्या प्राप्तीसाठी सशस्त्र क्रांतीचा पुरस्कार करणारे थोर देशभक्त, साहित्यिक आणि समाजसुधारक. ‘स्वातंत्र्यवीर’ म्हणून विख्यात. जन्म नासिकपासून काही अंतरावर असलेल्या भगूर ह्या गावी.
थोरले गणेश आणि सर्वांत धाकटे डॉ.नारायण हे त्यांचे दोन भाऊ. सावरकरांचे शिक्षण भगूर, नासिक, पुणे आणि मुंबई येथे एल्एल्.बी.पर्यंत झाले. पुढे ‘बॅरिस्टर’ ही पदवी त्यांनी लंडनला जाऊन घेतली. विद्यार्थिजीवनाच्या आरंभापासूनच सावरकरांचा वाचनाकडे ओढा होता. त्यात विष्णुशास्त्री चिपळूणकरांची निबंधमाला, रामायण-महाभारत, विविध बखरी आणि इतिहासग्रंथ, तसेच मोरोपंत, वामनादिकांचे काव्यग्रंथ इ. साहित्याचा समावेश होता. संस्कृत साहित्याचाही त्यांचा अभ्यास चांगला होता. विविध वृत्तपत्रांच्या वाचनातून देश-विदेशांतील परिस्थितीचे तल्लख भानही त्यांना येत गेले होते. सावरकर हे वृत्तीने कवी होते आणि लहान वयापासून त्यांनी उत्तम वक्तृत्वही अभ्यासपूर्वक कमावले होते.
१८९७ साली पुण्यात आलेल्या प्लेगच्या साथीत इंग्रज सैनिकांनी घरोघरी जाऊन तपासण्या करताना नागरिकांवर जे अत्याचार केले, त्याचा सूड घेण्यासाठी चाफेकर बंधूंनी ह्या तपासण्यांवर देखरेख करणारा पुण्याचा कमिशनर रँड ह्याचा खून केला आणि ह्या संदर्भात सरकारला माहिती देणाऱ्या गणेश आणि रामचंद्र द्रविड ह्यांनाही ठार मारले. चाफेकर बंधूंना फाशी देण्यात आले. त्यांच्या बलिदानाचा सावरकरांच्या मनावर खोल ठसा उमटला आणि त्यांनी स्वातंत्र्यासाठी सशस्त्र युद्घ करण्याची शपथ घेतली. १८९९ मध्ये सशस्त्र क्रांतीच्या कार्यासाठी त्यांनी ‘राष्ट्रभक्त समूह’ हे गुप्तमंडळ स्थापन केले तथापि प्रकट चळवळीसाठी एखादी संस्था असावी, ह्या हेतूने त्यांनी जानेवारी १९०० मध्ये ‘मित्रमेळ्या’ची स्थापना केली. त्यांच्या भोवती अनेक निष्ठावंत तरुण जमले. त्यांत कवी ⇨ गोविंद ह्यांचा समावेश होता. शिवजयंत्युत्सव, गणेशोत्सव, मेळे ह्यांच्या माध्यमातून लोकजागृती घडवून आणणाऱ्या मित्रमेळ्याच्या कार्यक्रमाला कवी गोविंदांच्या काव्यरचनांनी प्रभावी साथ दिली. सावरकरांनी ठिकठिकाणी मित्रमेळ्याच्या शाखा उभारून स्वातंत्र्यासाठी सशस्त्र उठाव करण्याची तयारी असलेल्या तरुणांचे व्यापक जाळे निर्माण केले. पुढे १९०४ मध्ये ह्या मित्रमेळ्याचे रूपांतर ‘अभिनव भारत’ ह्या संस्थेत झाले. क्रांतिकारक म्हणून ⇨ जोसेफ मॅझिनी ह्या इटालियन देशभक्ताचा आदर्श त्यांच्यासमोर होता. त्याचप्रमाणे आयर्लंड आणि रशियातील क्रांतिकारकांचेही सावरकरांना आकर्षण होते. गनिमी काव्याचे धोरण सैन्यांत व पोलिसांत गुप्त क्रांतिकारकांची भरती करणे रशियासारख्या परराष्ट्रांशी गुप्त संधान बांधणे इंग्रजी सत्तेच्या केंद्रांवर आणि प्रतिनिधींवर हल्ले करणे शस्त्रास्त्रे साठवणे इ. मार्ग अवलंबून इंग्रजांना राज्य करणे नकोसे करून सोडावे, असे मार्ग सावरकरांना उचित वाटत होते.
‘मित्रमेळ्याचे ’ काम करीत असताना सावरकरांचे लेख, कविता इ. साहित्य ठिकठिकाणी प्रसिद्घ होत होते आणि प्रभावीही ठरत होते. पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात शिकत असताना त्यांनी विदेशी कपड्यांची होळी करण्याचा एक कार्यक्रम पार पाडला होता. परिणामतः त्यांना दंड भरावा लागला आणि महाविद्यालयाच्या वसतिगृहातून काढून टाकण्यात आले.
एल्एल्.बी. झाल्यानंतर लंडनमध्ये बॅरिस्टरीचे शिक्षण घेण्यासाठी ९ जून १९०६ ह्या दिवशी सावरकरांनी भारताचा किनारा सोडला. लंडनमध्ये असलेले क्रांतिकारक ⇨ श्यामजी कृष्ण वर्मा ह्यांनी दिलेल्या शिष्यवृत्तीमुळे हे त्यांना शक्य झाले. लंडनमध्ये असताना सावरकरांनी जी कामे केली, त्यांचे तीन भाग सांगता येतील : (१)साहित्यनिर्मिती (२) प्रकट चळवळी आणि समारंभ, (३) गुप्त क्रांतिकार्य.
लंडनमध्ये असताना विहारी आणि काळ ह्या मराठी नियतकालिकांसाठी सावरकरांनी वार्तापत्रे पाठविली. त्याचप्रमाणे जोसेफ मॅझिनी यांचे आत्मचरित्र व राजकारण (१९०७) हा ग्रंथ अनुवादित केला. १८५७ चे भारतीय स्वातंत्र्यसमर ह्या ग्रंथाचे हस्तलिखितही पूर्ण केले (सु. १९०८).
ह्या हस्तलिखितावर पोलिसांची नजर होती. त्यामुळे ते सहजासहजी प्रसिद्घ होईना. तो ग्रंथ इंग्रजीत अनुवादून परदेशात प्रसिद्घ करणेही अवघड गेले. अखेरीस हॉलंडमध्ये त्याच्या अनुवादाच्या छपाईची व्यवस्था झाली. ह्या ग्रंथाच्या मराठी हस्तलिखिताचा पहिला मसुदा लंडनमध्ये ‘अभिनव भारत’चे सभासद झालेल्या डॉ. कुटिन्हो ह्यांच्याकडे होता. तो १९४९ मध्ये सावरकरांना परत मिळाला. ह्या ग्रंथाची आवृत्ती २००८ मध्ये निघाली आणि तिच्या एक लाखांहून अधिक प्रती ती प्रसिद्घ होताच खपल्या.
१८५७ च्या उठावाचा व्याप फार मोठा होता आणि ब्रिटिश साम्राज्याला जबरदस्त धक्का देणारा तो पूर्वनियोजित संग्राम होता अशी सावरकरांची धारणा होती. तसेच उठाव कसा केला पाहिजे, ह्याचा एक वस्तुपाठच ह्या उठावाने निर्माण केला, असेही त्यांचे मत होते. लंडनमधील वास्तव्यकालात सावरकरांनी शिखांचा इतिहासही लिहिला पण तो प्रसिद्घ होऊ शकला नाही. त्याचे मूळ हस्तलिखितही गहाळ झाले. मात्र शीख पलटणीत उठावाची प्रवृत्ती निर्माण करण्यासाठी त्यांनी क्रांतिकारक पत्रके लिहून ती गुप्तपणे तिकडे पोहोचतील अशी व्यवस्था केली. स्वातंत्र्याकांक्षी आयरिश लोक न्यूयॉर्क येथून चालवीत असलेल्या गेलिक अमेरिकन ह्या वृत्तपत्रात त्यांनी ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध लेखही लिहिले. लंडनमधील आपल्या प्रकट स्वरूपाच्या कार्यासाठी ‘फ्री इंडिया -सोसायटी’ ची स्थापना करून त्या संस्थेतर्फे शिवोत्सव, १८५७ च्या स्वातंत्र्यसमराचा महासोहळा, श्रीगुरूगोविंदसिंग ह्यांचा जन्मदिवस, विजयादशमीचा उत्सव असे विविध उत्सव सावरकरांनी घडवून आणले.
लंडनला सावरकरांच्याबरोबर असलेले ⇨ सेनापती बापट ह्यांनी बाँब तयार करण्याची विद्या काही रशियन क्रांतिकारकांच्या साहाय्याने माहीत करून घेतली होती. ही माहिती भारतात क्रांतिकारकांच्या विविध केंद्रांवर पाठविण्यात आली होती. पुढे वसई येथे बाँबचा कारखाना काढण्यात आला. सावरकरांनी काही पिस्तुले मिळवून तीही भारतात पाठविली होती. त्यातली काही सर सिकंदर हयात खान ह्यांनी आणली होती. ब्रिटनविरुद्घ जागतिक पातळीवर मोठे षड्यंत्र उभारण्याचाही सावरकरांचा प्रयत्न होता.
ब्रिटिशांच्या दडपशाहीचा एक भाग म्हणून ⇨ बाबाराव सावरकर ह्यांच्यावर राजद्रोहाचा आरोप ठेवून त्यांना जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली. त्यांची सारी मालमत्ता जप्त करण्याचे आदेशही देण्यात आले. त्यानंतर काही दिवसांनीच ‘अभिनव भारत’ चे एक सदस्य ⇨ मदनलाल धिंग्रा ह्यांनी भारतमंत्र्याचे स्वीय सहायक कर्झन वायली ह्यांचा लंडनमध्ये गोळ्या झाडून खून केला (१ जुलै १९०९). ह्याच्या निषेधार्थ ५ जुलै रोजी लंडनच्या ‘कॅक्स्टन हॉल’ मध्ये भरलेल्या सभेत सावरकरांनी निषेधाच्या ठरावाला विरोध केला. ठरावावरच्या भाषणात न्यायालयीन निर्णय होण्यापूर्वीच धिंग्रांना गुन्हेगार ठरविणे हे न्यायालयाच्या अधिकारांवर अतिक्रमण होते, असा युक्तिवाद सावरकरांनी वृत्तपत्रांना पत्र पाठवून केला. सावरकरांच्या हालचालींमुळे त्यांना बॅरिस्टरीची सनद मिळण्यातही अडचणी उत्पन्न झाल्या होत्या. अहमदाबाद येथे व्हॉइसरॉयवर बाँब टाकण्याच्या प्रकरणात त्यांचे धाकटे बंधू नारायणराव सावरकर ह्यांनाही अटक झाली होती. ह्या सर्व घटनांचा ताण सावरकरांच्या मनावर पडला. या सुमारास त्यांना न्यूमोनियाही झाला. त्यातून उठल्यावर ते पॅरिसला गेले. तेथे ते ⇨ भिकाजी रुस्तुम कामा ह्यांच्याकडे राहिले. दरम्यानच्या काळात नासिकचा ब्रिटिश कलेक्टर जॅक्सन ह्याचा खून झाला. ह्या वधासाठी वापरलेली पिस्तुले सावरकरांनी भारतात पाठविलेल्या पिस्तुलांपैकी असल्यामुळे हे सर्व प्रकरण सावरकरांपर्यंत पोहोचले. त्यानंतर तेथे सावरकरांच्या आप्तांचा आणि सहकाऱ्यांचा पोलिसी छळ सुरू झाला. ह्या परिस्थितीत पॅरिसला राहून अटक टाळण्यापेक्षा लंडनला जाऊन अटक होण्याचा धोका आपण पत्करावा असे त्यांनी ठरविले. १३ मार्च १९१० रोजी त्यांना अटक झाली. पुढे चौकशीसाठी त्यांना भारतात नेले जात असताना मार्से बंदरात त्यांनी प्रातर्विधीला जाण्याच्या निमित्ताने शौचकुपात जाऊन तिथल्या ‘पोर्ट होल’ मधून समुद्रात उडी घेतली आणि ते मार्सेच्या धक्क्यावर फ्रेंच हद्दीत आले. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी तिथे येऊन त्यांना अटक केली. अशी अटक कायदेशीर नाही, ह्या मुद्यावर सावरकरांतर्फे द हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात मागितलेली दादही व्यर्थ ठरली.
सावरकरांना हिंदुस्थानात आणून त्यांच्यावर दोन खटले चालविण्यात आले. जॅक्सनच्या वधाला साहाय्य केल्याचा तसेच अन्य काही आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले होते. आपण फ्रान्सच्या भूमीवर असताना बेकायदेशीरपणे आपल्याला अटक केल्यामुळे तसेच हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा निकाल तेव्हा आलेला नसल्यामुळे आपण ह्या खटल्यांच्या कामात भाग घेणार नाही, अशी सावरकरांची भूमिका होती. ह्या दोन्ही खटल्यांचा निकाल लागून सावरकरांना पन्नास वर्षांच्या जन्मठेपेची शिक्षा झाली त्यांची सगळी मिळकतही जप्त करण्यात आली (२४ डिसेंबर १९१० आणि ३० जानेवारी १९११).
सावरकरांना अंदमानात ४ जुलै १९११ रोजी आणण्यात आले. छिलका कुटणे, काथ्या वळणे, कोलू फिरवणे अशी अतिशय कष्टाची कामे त्यांना तुरुंगात करावी लागली.तिथल्या हालअपेष्टांमुळे त्यांचे शरीर खंगत गेले, पण अशाही परिस्थितीत त्यांनी कमला हे दीर्घकाव्य रचावयास घेतले. अंदमानातल्या राजबंद्यांना संघटित करून त्यांनी त्यांच्या काही मागण्यांची तड लावली. ग्रंथाभ्यासाची संधी उपलब्ध होताच त्यांनी अफाट वाचन केले. त्यात भारतीय तत्त्वज्ञान, प्लेटो, ॲरिस्टॉटल, मिल, स्पेन्सर आदींचे ग्रंथ तसेच ज्ञानेश्वरी, कुराण, बायबल ह्यांच्या वाचनाचा समावेश होतो. बंदिवानांमध्येही त्यांनी अभ्यासाची आवड उत्पन्न करण्याचा प्रयत्न केला.
सावरकर हिंदीचे अभिमानी होते. हिंदी भाषेच्या प्रचाराचेही त्यांनी अंदमानात काम केले. हिंदी ही राष्ट्रभाषा झाली पाहिजे, ह्या मताचे ते होते. मात्र इतर प्रांतांच्या भाषाही शिकल्या पाहिजेत, असे ते सहबंदिवानांना सांगत असत. तसेच त्यांना साक्षर बनविण्याचे कार्यही त्यांनी तेथे केले.
१९२१ मध्ये सावरकरांना अंदमानामधून हिंदुस्थानात आणण्यात आले आणि रत्नागिरीच्या तुरुंगात ठेवण्यात आले. तिथे त्यांनी हिंदुत्व (मूळ ग्रंथ इंग्रजी मराठी अनुवाद, १९२५) आणि माझी जन्मठेप (१९२७) हे ग्रंथ लिहिले. अंदमानात असताना सावरकरांनी एक ग्रंथालय उभे केले होते. येथेही त्यांनी सरकारकडे प्रयत्न करून ग्रंथालय उभारले. सावरकरांची १९२४ मध्ये दोन अटींवर तुरुंगातून मुक्तता करण्यात आली : (१) रत्नागिरी जिल्ह्यात ते स्थानबद्घ म्हणून राहतील. (२) पाच वर्षे ते राजकारणात सहभागी होणार नाहीत. जवळपास साडेतेरा वर्षे सावरकर रत्नागिरीत होते. ह्या काळात त्यांनी अस्पृश्यतानिवारण, धर्मांतर करून गेलेल्यांना पुन्हा हिंदू धर्मात घेणे, भाषाशुद्घी आणि लिपीशुद्घी ह्या चळवळी केल्या.
अस्पृश्य व उच्चवर्णीय ह्यांच्यात सामाजिक अभिसरण घडून यावे, ह्यावर त्यांच्या अस्पृश्यनिवारण चळवळीचा विशेष भर होता. त्यासाठी स्पृश्यास्पृश्यांची सहभोजने, सर्व जातींतील महिलांचे हळदीकुंकवांचे समारंभ, शाळांमधून स्पृश्यास्पृश्य मुलांचे सहशिक्षण इ. उपक्रम त्यांनी राबविले. हे सर्व करताना त्यांना सनातन्यांच्या तीव्र विरोधाला तोंड द्यावे लागले. अस्पृश्यांना मंदिरप्रवेशबंदी असल्यामुळे त्यांनी भागोजीशेठ कीर ह्या दानशूर सद्गृहस्थाकडून सर्व हिंदूंसाठी प्रवेश असलेले पतित पावन मंदिर बांधविले (१९३१). रत्नागिरीतील विठ्ठलमंदिरात होणाऱ्या गणेशोत्सवात अस्पृश्यांना प्रवेश देणार नाही, अशी भूमिका सनातन्यांनी घेताच सावरकरांनी अखिल हिंदू गणपती स्थापन करून त्याचा उत्सव केला आणि गणेशमूर्तीची पूजा एका सफाई कामगाराच्या हस्ते केली. धर्मांतरितांना पुन्हा हिंदू धर्मात सन्मानपूर्वक प्रवेश देऊन त्यांनी त्यांची लग्ने हिंदू समाजात लावून देण्यासाठी पुढाकार घेतला, त्यासाठी आर्थिक साहाय्यही दिले.
सावरकरांना हिंदू समाजात प्रबोधन घडवून आणावयाचे होते दबलेल्या हिंदूंना आपल्या स्वत्वासह पुन्हा उभे करायचे होते. भाषाशुद्घी, लिपीशुद्घी ह्या त्यांच्या चळवळीही त्यासाठीच होत्या. अरबी, फार्सी आणि इंग्रजी भाषांचे आपल्या भाषांवर होणारे आक्रमण थोपवून आपल्या भाषांना त्यांचे विशुद्घ रूप प्राप्त करून दिले पाहिजे, ही त्यांची भूमिका होती. नागरी लिपीच्या संदर्भातही त्यांनी काही सुधारणा सुचविल्या होत्या.
सावरकरांची बिनशर्त मुक्तता १० मे १९३७ रोजी करण्यात आली. त्यानंतर ते हिंदुमहासभेत गेले आणि त्या पक्षाचे नेतृत्वही त्यांच्याकडे आले. सावरकरांनी हिंदुमहासभेतर्फे निःशस्त्र प्रतिकाराचे दोन लढे दिले : एक, भागानगरचा आणि दुसरा, भागलपूरचा. भागानगरचा लढा निझामाच्या अत्याचारांविरुद्घ होता. परिणामतः निझामाच्या कायदेमंडळात जिथे हिंदूंना पूर्वी शून्य जागा होत्या, तेथे त्यांना पन्नास टक्के जागा निझामाला द्याव्या लागल्या. भागलपूरचा सत्याग्रह इंग्रजांविरुद्घ होता.
सावरकर सनदशीर मार्गांनी आपल्या चळवळी चालवीत होते, तरी सशस्त्र लढ्यावरचा त्यांचा विश्वास ढळला नव्हता, इंग्रजांविरुद्घ अखेरची लढाई सशस्त्र लढायची वेळ आली, तर आपल्या भारतीय तरुणांना सैनिकी शिक्षण असणे आवश्यक आहे, ही त्यांची स्पष्ट धारणा होती. त्यामुळे दुसरे महायुद्घ सुरू होताच, त्यांनी अशी निःसंदिग्ध भूमिका घेतली, की आपल्या समाजाच्या सैनिकीकरणास आणि औद्योगिकीकरणास साहाय्यभूत होणाऱ्या सर्व युद्घकार्यात आपण पूर्णपणे सहभागी झाले पाहिजे. सैन्यात आपल्या तरुणांना भूदल, नौदल, वायूदल ह्यांत दाखल होता येईल. शस्त्रास्त्रे बनविण्याचे आणि चालविण्याचे तंत्र त्यांना आत्मसात करता येईल. भारताचे सैनिकीकरण आणि औद्योगिकीकरण ह्यांचे महत्त्व त्यांना अपरंपार वाटत होते.
‘अखंड, एकात्म हिंदुस्थान’ ही सावरकरांची ठाम भूमिका होती. ती त्यांनी ‘क्रिप्स कमिशन’पुढेही मांडली. १५ ऑगस्ट १९४७ रोजी देश स्वतंत्र झाला, ह्याचा त्यांना आनंद झाला तथापि देशाची फाळणी झाली, देशाचे तुकडे झाले, ह्याचे त्यांना परमदुःख झाले. फाळणीनंतर हिंदूंवर झालेले अत्याचार, रक्तपात ह्यांनीही ते व्यथित आणि संतप्त झाले होते, ह्या भावना त्यांनी उघडपणे व्यक्त केल्या.
दिल्लीत महात्मा गांधींची हत्या झाली (१९४८). तीत सावरकरांचा सहभाग असल्याच्या संशयावरून त्यांना अटक करण्यात आली तथापि त्या खटल्यात सावरकरांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.
घटना समितीकडे १९४९ मध्ये त्यांनी तीन सूचना केल्या : देशाचे नाव भारत ठेवावे, हिंदी ही राष्ट्रभाषा करावी आणि नागरीलिपी ही राष्ट्रलिपी करावी तसे घडले.
भारतात सशस्त्र क्रांती करून स्वातंत्र्याची प्राप्ती करून घेण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या ‘अभिनव भारत’ ह्या संघटनेचा सांगता समारंभ १९५२ च्या मे महिन्यात पुण्यात साजरा करण्यात आला.
त्यांची प्रकृती १९६६ मध्ये ढासळली आणि त्यांनी प्रायोपवेशन करून जीवनाचा अंत करण्याचे ठरविले. मुंबई येथे त्यांचे देहावसान झाले. सावरकर हे हिंदुराष्ट्रवादी होते. आरंभी नव्हते तथापि अनुभवांच्या ओघात भारतीय वास्तवाचे त्यांना जे आकलन झाले, त्यानुसार ते हिंदुराष्ट्रवादाच्या भूमिकेवर आले. हिंदुत्व ह्या आपल्या ग्रंथात त्यांनी हिंदुत्वाच्या मूलभूत तत्त्वांचे विवेचन केले आहे.
सावरकर हे वृत्तीने कवी होते. ‘सागरा प्राण तळमळला’ ही कविता त्यांना एका तीव्र भावावेगाच्या प्रसंगी सुचली. रानफुले (१९३४) ह्या त्यांच्या काव्यसंग्रहात त्यांचे कमला हे खंडकाव्य, काही स्फुट काव्ये आणि वैनायक वृत्ताचा विशेष सांगणारा एक निबंध अंतर्भूत आहे. त्यांची संपूर्ण कविता सु. १३,५०० ओळींची भरेल. सावरकरांची कविता (१९४३) ह्या नावाने त्यांची कविता संकलित करण्यात आली आहे. माझी जन्मठेप ह्या त्यांच्या ग्रंथात अंदमानातील तुरुंगवासाचा आत्मचरित्रपर इतिहास आहे. माझ्या आठवणी (जन्मापासून नाशिकपर्यंत, १९४९), भारतीय इतिहासातील सहा सोनेरी पाने (२ खंड, १९६३) आणि शत्रूच्या शिबिरात (१९६५) हे त्यांचे अन्य काही उल्लेखनीय ग्रंथ होत. भारतीय इतिहासातील सहा सोनेरी पाने ह्या ग्रंथात बौद्घकाळाच्या आरंभापासून इंग्रजी राजवटीच्या अखेरीपर्यंत ज्या स्त्री-पुरुषांनी राष्ट्रीय स्वातंत्र्यासाठी पराक्रम केला, त्यांचा इतिहास आहे. शत्रूच्या शिबिरात हे त्यांच्या आत्मचरित्रात्मक पुस्तकांपैकी एक. मला काय त्याचे ? अथवा मलबारांतील मोपल्यांचे बंड (आवृ. दुसरी, १९२७) आणि काळे पाणी (१९३७) ह्या त्यांच्या दोन कादंबऱ्या. उःशाप (१९२७), संन्यस्त खड्ग (१९३१) आणि उत्तरक्रिया (१९३३) ही त्यांनी लिहिलेली नाटके. सावरकरांचे जात्युच्छेदक निबंध (१९५०) त्यांची जातिभेदनिर्मूलक भूमिका स्पष्ट करतात. त्यांच्या इंग्रजी ग्रंथांत वॉर ऑफ इंडियन इंडिपेंडन्स १८५७, हिंदुपदपादशाही, हिंदुराष्ट्र दर्शन, हिस्टॉरिक स्टेटमेंट्स आणि लेटर्स फ्रॉम द अंदमान (जेल) ह्यांचा समावेश होतो. हे सर्व साहित्य समग्र सावरकर वाङ्मय (खंड १ ते ८, १९६३–६५)ह्यात समाविष्ट आहे.
मुंबई येथे १९३८ मध्ये भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलनाचे ते अध्यक्ष होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी भाषाशुद्धी आणि लिपीशुद्घी ह्यांचे महत्त्व सांगितले. वाङ्मयाचे वस्तुनिष्ठ आणि रसनिष्ठ असे दोन भाग कल्पून त्या दोहोंचे त्यांनी विवरण केले. भाषणाच्याअखेरीस ‘लेखण्या मोडा आणि बंदुका हातात घ्या’, असा संदेश त्यांनी दिला. १९४३ मध्ये सांगली येथे भरलेल्या नाट्यशताब्दी महोत्सवाचे तेअध्यक्ष होते. त्याच वर्षी त्यांना नागपूर विद्यापीठाकडून डी.लिट्. ही सन्माननीय पदवी देण्यात आली.
संदर्भ : १. करंदीकर, शि. ल. सावरकर-चरित्र (कथन), पुणे, १९४३.
२. कीर, धनंजय अनु., खांबेटे, द. पां. स्वातंत्र्यवीर सावरकर, मुंबई, १९८३.
३. गावडे, प्र. ल. सावरकर : एक चिकित्सक अभ्यास, पुणे, १९७०.
४. जोगळेकर, ज. द. स्वातंत्र्यवीर सावरकर : वादळी जीवन, पुणे, १९८३.
५. नवलगुंदकर, शं. ना. स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर, पुणे, २०१०.
६. फडके, य. दि. शोध सावरकरांचा, पुणे, १९८४.